कर्जत, श्रीगोंद्यातील गावांना पुराचा धोका

चालूघडामोडी

ब्रेकिंग न्यूज

shadow

कर्जत(APLive24):भीमा नदीपात्रात दोन लाख १४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसेच घोड धरणातून ३९ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे कर्जत व श्रींगोदे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

श्रींगोदे तालुक्यातील निमगाव खेलू व कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाचा बाजारतळ व स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पुरग्रस्त भागचा दौरा करून नागरिकांना दिलासा दिला. नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक येथील गणपतीच्या मंदिराच्या मागील बाजूस असलेला भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे पुणे आणि मुबंई येथून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यात अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यातील भांबोरा गावातील बाजारतळ व स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. उजनीच्या बॅकवॉटरचा फुगवटा वाढण्याची शक्यता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे उसाचे पीक पाण्यात गेल्याने नुकसान होत आहे. या परिसराची राम शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. मगेंश जगताप, सरपंच वैशाली मोरे, बाळासाहेब मोरे, उपसरपंच रमेश पवार, व्हा. चेअरमन नितीन जाधव, सुदर्शन कोपनर गणेश भोसले, बंडा मोरे, शंकर भोसले, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार सी. एम. वाघ, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह तलाठी, मंडलनिरीक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील खडकवासला व कुकडीच्या विविध धरणांसह मुळा, मुठा नद्यांतून येणारे पाणी भीमा नदीत येत असल्याने कर्जत तालुक्यातील जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, भांबोरा, शिपोरा या गावाना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी दिल्या आहेत.

उजनी धरणाच्या बँकवॉटरमुळे भांबोरा गावाजवळ पाणी आले आहे. गावाचा बाजार जेथे भरतो ते ओटे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय गावच्या स्मशानभूमीलागी पाण्याचा वेढा पडला आहे. येथील देवस्थानच्या बारवात पाणी शिरू लागले असून लवकर ती भरून गावात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेळी सरपंच अशोक चव्हाण, पोलिस पाटील देवीदास गोडसे उपस्थित होते.

फोटो- कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांना पुरामुळे धोका निर्माण झाला असून सोमवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या भागाची पाहणी केली.

 

 

जाहिरात

shadow

संबंधित