मुळा 82 तर जायकवाडी 61 टक्के भरले!

चालूघडामोडी

ब्रेकिंग न्यूज

shadow

गोदावरी, मुळेचा पूर ओसरला । भंडारदरात पुन्हा जोरदार पाऊस । प्रवरेचा विसर्ग वाढविला
 
अकोले (APLive24):राहुरी, नेवासा, नगर आणि पाथर्डीच्या पिण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचे भवितव्य असणार्‍या मुळा धरणात काल रात्री 21322 दलघफू (82 टक्के) साठा झाला आहे. मुळा नदीचा पूर ओसरला असल्याने धरणात पाण्याची आवक 12041 क्युसेकपर्यंत घटली आहे. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आता काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.  दरम्यान, नगर-नाशिक जिल्ह्यातून जोरदार पाण्याची आवक होत असल्याने जायकवाडीतील पाणीसाठा काल रात्री 61 टक्क्यांच्यापुढे सरकला होता.
 
गत तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. या पाण्याचे जायकवाडी धरणातील पाणीसाठा काल सायंकाळपर्यंत 60 टक्क्यांवर पोहचला होता. अजूनही गोदावरीतून रात्री 61546 क्युसेक तसेच प्रवरा नदीतून 19000 क्युसेकने पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. भीमा नदीतील पाणीपातळी टिकून असून प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
 
भंडारदरा पाणलोटातही मंगळवारी रात्री 8.30 वाजेपासून पुन्हा संततधार सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे रात्री 9 वा. धरणातून विसर्ग 5700 करण्यात आला आहे. तो त्यापूर्वी 3460 क्युसेक होता. परिणामी पावसाचा जोर कायम राहिल्यास प्रवरा नदीतील पाणी वाढण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, पुरामुळे नदीकाठच्या श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील काही गावांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली होती. पण पाणलोटात पाऊस कमी झाल्याने नद्यांचे पूरही ओसरू लागला आहे. परिणामी या गावातील जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. कोपरगावातून बसेसची वाहतूक थांबली होती. तीही आता सुरू झाली आहे.
 
 

जाहिरात

shadow

संबंधित