अहमदनगर:आजपासून कांदा सत्याग्रह आंदोलन

शेती

shadow

अहमदनगर(APLive24):सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी न हटवल्यास येत्या सोमवारपासून (७ ऑक्टोबर) राज्यात कांदा सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे. कांदा निर्यात खुली करून कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचे आदेश होईपर्यंत आत कांदा मार्केट बंद आंदोलन सुरू राहील', अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, युवा आघाडीचे अभिमन्यू शेलार उपस्थित होते.

कांदा निर्यात बंदी व कांदा साठ्यांवरील निर्बंधांमुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. कांदा साठ्यांवरील मर्यादेमुळे व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करणे अशक्य झाले आहे. सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहे. यापूर्वीच्या पक्षाच्या सरकारांनीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते. कोणताही अशा पद्धतीचा निर्णय घेण्यापूर्वी सरकार कांदा व्यापारी किंवा शेतकरी प्रतिनिधींचा विचार घेण्याची तसदीसुद्धा घेत नाही, हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे आंदोलन दोन टप्प्यांत होणार आहे. कांद्यावरील निर्बंध हटेपर्यंत कांदा व्यापार बंद ठेवण्यात येईल. सोमवारपासून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये. तसेच व्यापार स्वातंत्र्य दिले जात नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या सभांवर बहिष्कार घालणे, या पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे धोरण शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन संघटना करणार आहे. सरकारने शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींशी निर्बंध हटवण्याबाबत चर्चा करावी. कारण आताच निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे. निर्यातबंदी उठवली गेली नाही तर पुढील कांदा अत्यल्प दरात विकावा लागणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. सरकारने कांदा साठवणुकीवरही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारीसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत व्यापारी फेडरेशन बरोबर चर्चा झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

जाहिरात

shadow