स्टार प्रचारकांचा यंदा नवा घरोबा

राजकारण

shadow

पुणे(APLive24):विधानसभेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झालेली असतानाच, ती अधिक रंगतदार करणाऱ्या सर्वपक्षीय स्टार प्रचारकांपैकी अनेकांनी यंदा पक्षांतर केले आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला असून, या दोन्ही पक्षांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून जवळपास १० नेत्यांनी अन्य पक्षांशी घरोबा केला आहे. त्यांपैकी बहुतांश नेते भाजपमध्ये गेले असून, काहींनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या यंदाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत काही मुलुखमैदानी तोफांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

खुमासदार शैलीत भाषणे करणाऱ्या, विरोधकांच्या आरोपांच्या फैरींना सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या, प्रतिस्पर्ध्यांना चिमटे काढून, प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टार प्रचारकांची गरज भासते. त्यामुळे मतदारसंघात एका तरी स्टार प्रचारकाची सभा लावावी, यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्नशील असतो. अशा स्टार प्रचारकांची यादी प्रत्येक पक्ष जाहीर करतो. मात्र, या यादीतील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोकसभेपूर्वी, तर हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची तळी उचलली आहे, तर नारायण राणेदेखील भाजप प्रवेशासाठी तिष्ठत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर यांनी १९ वर्षानंतर काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने त्यांचे नाव राष्ट्रवादीला स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळावे लागणार आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपशी जवळीक साधली आहे, तर आमदार जयदत्त क्षीरसागर, धनंजय महाडिक, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून, भाजपशी घरोबा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले भास्कर जाधव यांनी पुन्हा सेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांचे निधन झाल्यामुळे पक्षाला स्टार प्रचारकांच्या यादीत सुधारणा करून, नव्या नेत्यांची नावे समाविष्ट करावी लागणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यातील अरुण जेटली, सुषमा स्वराज, अनंत कुमार, मनोहर पर्रीकर या पक्षाच्या दिग्गज नेत्यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. त्यामुळे केवळ औपचारिकेतपोटी त्यांचे नाव पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ठेवले जाईल, अशी चर्चा आहे.

सेनेकडून कोल्हेंचे नाव 'डिलिट'

भाजपच्या यादीतून नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपला अलविदा करून, काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वी शिवसेनेत असलेले डॉ. अमोल कोल्हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने सेनेला त्यांचे नाव वगळावे लागणार आहे.
 

जाहिरात

shadow

संबंधित